नगर | मुंबई-पुणे येथून येणार्‍यांना विलगीकरणात ठेवा – थोरात

पारनेरकरांच्या शिस्तबद्ध लॉकडाऊनचे महसूलमंत्र्यांकडून कौतुक

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेरकरांनी लॉकडाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पाळला. त्यासाठी नागरिकांचे व प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे. पारनेरकर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निर्बंधाचे पालन करत आहेत. तालुक्यातील अनेक व्यक्ती मुंबई- पुण्यामध्ये असल्याने सर्वात जास्त धोका तिकडून आहे. त्यामुळे बाहेरून येणारे सर्व नागरिक आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवावे अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आढावा बैठकीत दिल्या.

पारनेर तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पारनेर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी आ. निलेश लंके, आ. सुधीर तांबे, जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके, जि. प.बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते, सभापती गणेश शेळके, सभापती प्रशांत गायकवाड, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, मुख्य अधिकारी डॉ. सूनिता कुमावत, प.स. सदस्य श्रीकांत पठारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, पं.स.सदस्य ताराबाई चौधरी आदी उपस्थित होते. 

यावेळी थोरात म्हणाले,  अळकुटी, जवळा, पारनेर शहर व टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी सातत्याने रुग्णवाढ होत आहे. त्याचे नेमके कारण काय आहे, त्या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे. आमदार निलेश लंके यांनी सध्या अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाही. व्हेंटिलेटर रेमडेसिविर लसीकरण ऑक्सिजन मिळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. 

भाळवणी येथे 100 ऑक्सिजन बेड आहेत. मात्र, तेथे ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. त्यासाठी ऑक्सिजन, इंजेक्शन व औषधाचा पुरवठा करावा, अशी मागणी महसूलमंत्री थोरात यांच्याकडे केली. तहसीलदार ज्योती देवरे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना एलसीडी स्क्रीनवर तालुक्यातील करोना संदर्भात करत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

पाहुण्यांचे संस्थात्मक विलगीकरणाचे आदेश

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बाहेरून येणार्‍या पाहुण्यांचे विलगीकरण करा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी तत्पर यासंदर्भात करोना ग्रामसुरक्षा समिती यांनी मुंबई-पुणे आदी ठिकाणांहून येणार्‍या नागरिकांना दहा दिवसासाठी गावातील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण करायचे आदेश दिले. गावात कोणालाही थेट प्रवेश नाही. सरपंचांनी याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवायचे असे आदेश देण्यात आले आहे. त्याकामी गावातील शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात. जे मुख्याध्यापक सहकार्य करणार नाहीत, त्यांचा प्रस्ताव कार्यालयास करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.