पुणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील मुंबईसह अन्य सर्व विमानतळांवर बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान, पुणे शहरात खबरदारी म्हणून 12 खासगी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सोसायटी ऑफ मेडिकल इमर्जन्सीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. संगीत खेनट, शिवणे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र कदम, डॉ. विजय वरद उपस्थित होते. शहरातील 10 ते 12 खासगी रुग्णालयांकडून कक्ष सुरू करण्याबाबत महापालिकेला प्रस्ताव आले होते. संबंधित रुग्णालयांतील सुविधांची तपासणी केली जात आहे. त्यानंतर कक्ष सुरू होतील.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांची संशयित म्हणून तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. नागरिकांनी स्वच्छता ठेवावी. अन्नपदार्थ शिजवून खावेत. महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.
– डॉ. संजीव वावरे, महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी