नवी दिल्ली : माजी आयएएस प्रोबेशनर अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सक्षम आणि अपंग उमेदवारांसाठी स्वतंत्र परीक्षा घेता येणार नाहीत. पूजा खेडकरवर नागरी सेवा परीक्षेत अपंग आणि ओबीसी कोट्याचा फायदा घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. न्या. बी. व्ही. नागरत्न आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने पूजा खेडकर यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी निश्चित केली आहे.
पूजा खेडकर यांच्या वकिलाने दिल्ली सरकारच्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी काही वेळ मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १५ एप्रिल ही तारीख निश्चित केली. त्यामुळे किमान त्या तारखेपर्यंत पूजा खेडकर यांना अटक होणार नाही. दिल्ली सरकारच्या वतीने उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी पूजा खेडकरला देण्यात आलेल्या दिलाशाला विरोध केला आणि सांगितले की, तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. तिला बनावट अपंगत्व प्रमाणपत्र कोणत्या मध्यस्थाद्वारे मिळाले हे शोधणे गरजेचे राहील. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणाले की, अपंगत्व प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर यांना नागरी सेवा परीक्षेत बसण्याची अतिरिक्त संधी मिळाली.
पूजा खेडकर यांच्या वतीने वरिष्ठ वकील बीना माधवन न्यायालयात हजर झाल्या. त्यांनी सांगितले की, आम्ही तपास यंत्रणेला तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत. पूजा खेडकरवर चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. मात्र, पूजा खेडकर यांनी आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. पूजा खेडकरवर तिच्या प्रशिक्षण कालावधीत सरकारी निवासस्थान, कर्मचारी, गाडी आणि कार्यालयात स्वतंत्र केबिनची मागणी केल्याचा आरोप आहे.