आयपीएलसाठी संघमालकांची तयारी
मुंबई :- बीसीसीआयने दुबईत आयपीएल स्पर्धा घेण्याचे संकेत दिल्यानंतर आता संघमालकही तयारीला लागले आहेत. करोनाचे नियम जाचक ठरू नयेत यासाठी आता स्पर्धा जाहीर झाल्यावर खास विमानाने त्यांना नेले जाणार आहे.
या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले की त्यापूर्वी 15 दिवस आधी खेळाडूंना अबुधाबीत नेले जाणार असून तेथे त्यांना सर्व त्या सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. खरेतर या स्पर्धेसाठी या सर्व गोष्टी करणे प्रचंड खर्चिक आहे. मात्र, स्पर्धा जर खेळवायची असेल त्या करणे आवश्यक आहे.
एका संघात साधारणपणे 30 खेळाडू व 15 जणांचा सपोर्ट स्टाफ असतो. या सगळ्यांची व्यवस्था संघमालकांना पाहावीच लागणार आहे. त्यापूर्वी खेळाडूंचे सराव सत्र कुठे व किती दिवसांचे होईल तेदेखील पाहावे लागणार आहे.
अबुधाबीला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागणार असून तेथे गेल्यानंतरही विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागेल तसेच तेथील सरकारने जाहीर केलेले सर्व आदेशही पाळावे लागतील, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.