सेन्सेक्‍स 50,500 अंकापर्यंत वाढणार?

अर्थव्यवस्था विस्तारणार; बीएनपी परिबा संस्थेचे मत

मुंबई – विकास दर शुन्य टक्‍क्‍यापेक्षा कमी राहणार असताना शेअर बाजाराचे निर्देशांक मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे मत काही अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र तरीही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर आगेकूच करीत आहेत. आता बीएनपी परिबा या संस्थेने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 2021 च्या अखेरीस नऊ टक्‍क्‍यांनी वाढून 50,500 अंकापर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.

मोठ्या कंपन्या मोठ्या होत जातात, पैसा पैश्‍याच्या जवळ पैसा जातो हे तर्कशास्त्र भारतीय शेअर बाजाराना लागू पडत आहे, असे या संस्थेचे म्हणणे आहे. भारताच्या दृष्टीकोनातून चिंतेच्या बाबी म्हणजे शहरी भागातील लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. महागाईचा टक्‍का वाढत चालला आहे. त्याचबरोबर बॅंकांचे ताळेबंद फारसे आशादायक नाहीत.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक 30 टक्‍क्‍यांनी कोसळले होते. मात्र एप्रिल नंतर निर्देशांकात 70 टक्के वाढ झाली आहे. जागतिक भांडवल बाजारात जास्त भांडवल आहे, त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले असल्याचे काही विश्‍लेषक सांगतात. तर तेजीचे समर्थन करणाऱ्या गुंतवणूकदारांना वाटते की, दीर्घ पल्ल्यात भारतीय शेअरबाजाराकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

निर्देशांक वाढले असले तरी ही गुंतवणूक भारतीय कंपन्यात समप्रमाणात न होता केवळ काही कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढत आहेत, हा अनेक जणांच्या चिंतेचा विषय आहे.

या अहवालात म्हटले आहे की, भारतातील बड्या कंपन्या काहीना गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत असताना चोखंदळ गुंतवणूकदारांना इतर कंपन्यांचे शेअर तुलनेने कमी भावावर मिळत असल्यामुळे आकर्षक वाटत आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था गुंतवणूकदारांना निराश करण्याची शक्‍यता कमी आहे. कारण वाहन विक्री वेगात वाढत आहे. इंधनाचा वापर वाढला आहे. रेल्वे माल वाहतूकही सुरळीत झाली आहे. जीएसटीचे संकलन एक लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. आता त्यात घट होण्याची शक्‍यता कमी आहे.

सरकारने पॅकेजमध्ये अनुदान न देता दिलेली रक्कम उत्पादन कशी होईल याची काळजी घेतली आहे. कामगार आणि कृषी क्षेत्रातील सुधारणा नेटाने राबविल्या जात आहेत. सरकारने देशांतर्गत उत्पादन वाढावे याकरिता उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना सुरू केली आहे.

निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत, या बाबी गुंतवणूकदारांना आकर्षक वाटत आहेत. मात्र या संस्थेने शहरातील नागरीकांचे उत्पन्न करोनानंतर कमी झाले आहे, ते वाढविण्यासाठी काही उपाययोजना आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यासाठी शहरातील प्रकल्पात गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.