मुंबई – माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी बायबॅकचा धुमधडाका सुरू केला असल्यामुळे शेअरबाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक आज सलग सहाव्या दिवशी वाढले.
मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 40 हजारांच्या पुढे गेला. बाजार बंद होताना हा निर्देशांक 303 अंकांनी म्हणजे 0.76 टक्क्यांनी वाढून 40,182 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 95 अंकांनी वाढून 11,834 अंकांवर बंद झाला.
इन्फोसिस, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बॅंक, सन फार्मा या कंपन्यांचे शेअर वधारले. जागतिक शेअरबाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय शेअरबाजारातील वातावरणही सकात्मक असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
टीसीएसचे बाजारमूल्य वाढले
टीसीएस कंपनी 16 हजार कोटी रुपयांच्या शेअरचे बायबॅक करणार असल्यामुळे या आठवड्यात या कंपनीचा शेअर तेजीत आहे. आता या कंपनीचे बाजारमूल्य 10.59 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. काल या कंपनीने बायबॅक करण्याचा निर्णय जाहीर केला.