मुंबई – करोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या सहामाहीत विकास दर शून्य टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. त्यातच रिझर्व्ह बॅंकेने विकास दरासाठी पूरक पतधोरण जाहीर केल्यामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी होऊन मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स प्रथमच 45,000 अंकाच्या पुढे जाऊन बंद झाला.
गेल्या काही दिवसापासून बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांच्या शेअरची खरेदी होत होती. आज पतधोरण जाहीर झाल्यानंतर खरेदीत वाढ होऊन निर्देशांकाना आधार मिळाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स कालच्या तुलनेत 1 टक्क्याने म्हणजे 446 अंकांनी वाढवून 45,079 अकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 124 अंकांनी 13,258 अंकावर बंद झाला.
व्यादरासंबंधित क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची आज खरेदी झाली. त्यामध्ये रिअल्टी आणि वाहन कंपन्यांचा समावेश होता. रिझर्व्ह बॅंकेने नजीकच्या भविष्यात व्याजदरात वाढ करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर विकास दर वाढता ठेवण्यासाठी भांडवल सुलभता उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आश्वस्त झाले. जागतिक बाजारातूनही आज सकारात्मक संदेश आले.