नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या दरातील घसरण,येस बॅंकेवरील संकट आणि करोना व्हायरस या संकटाचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजार चांगलाच घसरल्याचा पहायला मिळाला. शेअर बाजाराच्या निर्देशांकात 1400 अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा 400 पेक्षा जास्त अंकांनी गडगडला. निफ्टी सात महिन्यातील नीचांकी पातळीला पोहोचला आहे.
Sensex at 36,445.47, down by 1131.15 points. pic.twitter.com/eCEm5hDvd3
— ANI (@ANI) March 9, 2020
करोना व्हायरसमुळे आधीच शेअर बाजारात निरुत्साह असताना, येस बॅंकेवर आरबीआयने निर्बंध लादले त्यामुळे शुक्रवारी बाजार आणखी गडगडला. आता सौदी अरेबियाने तेल बाजारपेठेला मोठा धक्का दिला आहे. एकेकाळचा सहकारी असलेल्या रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.
सप्ताहाच्या शेवटी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 38 हजाराचा स्तर सोडत 37,576.62 वर येऊन ठेपला. तर 279.55 अंश घसरणीने 11 हजाराचा टप्पा सोडताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 10,989.45 पर्यंत स्थिरावला होता. निर्देशांकाच्या सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटींचे नुकसान झाले आहे.