Share Market 30 Oct: दोन दिवसांच्या वाढीनंतर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराचे बेंचमार्क निर्देशांक पुन्हा लाल रंगात बंद झाले. बुधवारी सेन्सेक्स 426.85 अंकांनी घसरून 79,942.18 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 126 अंकांनी कमजोर होऊन 24,340.85 वर बंद झाला. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी घसरून 84.04 रुपयांवर (तात्पुरता) बंद झाला.
जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंडमध्ये बँकिंग आणि वित्तीय समभागांमध्ये झालेल्या नुकसानीमुळे बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी बेंचमार्क इक्विटी निर्देशांक घसरले. याशिवाय कमकुवत कमाईची आकडेवारी आणि सतत परकीय निधी काढून घेतल्याने बाजारातील भावनांवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग घसरले, मारुती-इंडसइंड बँकेचे समभाग वधारले –
BSE सेन्सेक्स 426.85 अंकांनी किंवा 0.53 टक्क्यांनी घसरून 79,942.18 वर बंद झाला. NSE निफ्टी 126 अंकांनी किंवा 0.51 टक्क्यांनी घसरून 24,340.85 वर आला. सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, ॲक्सिस बँक, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँक यांच्यात घसरण पहायला मिळाली. तर, मारुती, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, आयटीसी आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स वाढीसह बंद झाले.
दरम्यान, एक दिवस आधी मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 363.99 अंकांनी किंवा 0.45 टक्क्यांनी वाढून 80,369.03 वर बंद झाला होता. निफ्टी 127.70 अंकांनी किंवा 0.52 टक्क्यांनी वाढून 24,466.85 वर बंद झाला होता.