Share Market: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विजयाच्या वृत्तादरम्यान भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख बेंचमार्क निर्देशांक एक टक्क्याहून अधिक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 901.50 अंकांनी वाढून 80,378.13 वर तर निफ्टी 270.75 अंकांनी वाढून 24,484.05 वर पोहोचला.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित असल्याने आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. BSE सेन्सेक्सने दुसऱ्या दिवशीही वाढ सुरू ठेवली आणि 901.50 अंकांनी किंवा 1.13 टक्क्यांनी उसळी घेत 80,378.13 वर बंद झाला. दिवसभरातील व्यापारादरम्यान तो 1,093.1 अंक किंवा 1.37 टक्क्यांनी वाढून 80,569.73 वर पोहोचला होता. NSE निफ्टी 270.75 अंकांनी किंवा 1.12 टक्क्यांनी वाढून 24,484.05 वर बंद झाला. ट्रम्प यांच्या विजयाच्या वृत्तानंतर डॉलर मजबूत झाल्याने रुपया 21 पैशांनी घसरून 84.30 (तात्पुरत्या) या सर्वकालीन नीचांकी पातळीवर आला.
टीसीएस आणि इन्फोसिसचे शेअर्स चार टक्क्यांहून अधिक वाढले –
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस यांचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक वाढले. एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, लार्सन अँड टुब्रो, मारुती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या समभागांमध्येही मोठी वाढ झाली. टायटन, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक हे पिछाडीवर होते.
जागतिक बाजारात सकारात्मक कल, अमेरिकन बाजार वाढीसह बंद –
आशियाई बाजारात टोकियोमध्ये तेजी राहीली तर सोल, शांघाय आणि हाँगकाँग घसरले. युरोपियन बाजार हिरव्या लंगात राहिले. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 2 टक्क्यांनी घसरून $74.02 प्रति बॅरलवर आले.
एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) मंगळवारी 2,569.41 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) 3,030.96 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
दरम्यान, सोमवारच्या तीव्र घसरणीतून सावरत, बीएसई निर्देशांक काल मंगळवारी 694.39 अंकांनी किंवा 0.88 टक्क्यांनी वाढून 79,476.63 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी 217.95 अंकांनी किंवा 0.91 टक्क्यांनी वाढून 24,213.30 वर बंद झाला होता.