Share Market Updates 25 Oct: दिवाळीपूर्वीचा आठवडा शेअर बाजाराला नुकसानीचा ठरला आहे. सलग पाचव्या व्यापार सत्रात शुक्रवारी शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 660 अंकांनी घसरला आणि 80,000 च्या खाली गेला. याचे कारण म्हणजे परकीय गुंतवणूकदारा मोठ्या प्रमाणावर भांडवल काढून घेत आहेत तसेच बहुतांश कंपन्यांच्या तिमाही निकालात त्यांच्या कमाईतील मंद वाढ दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा कल दिसून येत आहे.
शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 662.87 अंकांनी किंवा 0.83 टक्क्यांनी घसरून 79,402.29 वर आला. दिवसाच्या व्यवहारात तो 927.18 अंकांनी किंवा 1.15 टक्क्यांनी घसरून 79,137.98 वर आला होता. तर एनएसई निफ्टी 218.60 अंकांनी किंवा 0.90 टक्क्यांनी घसरून 24,180.80 वर आला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांना सुमारे 6.8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. या कालावधीत बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 436.9 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे.
इंडसइंड बँकेत 18.50% घसरण –
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी इंडसइंड बँक शेअर 18.50 टक्क्यांहून अधिक घसरले. त्याचे कारण म्हणजे सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 40 टक्क्यांनी घसरून 1,331 कोटी रुपयांवर आला आहे. तर शुक्रवारच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, मारुती, बजाज फायनान्स आणि टायटन हेही शेअर घसरणीसह बंद झाले.
आयटीसीचे शेअर्स दोन टक्क्यांहून अधिक मजबूत –
ब्लू-चिप समभागांमध्ये, आयटीसी 2 टक्क्यांहून अधिक वाढला. कंपनीने सप्टेंबर 2024 ला संपलेल्या दुस-या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 1.8 टक्क्यांनी 5,054.43 कोटी रुपयांची वाढ नोंदवली आहे. यासह ॲक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, सन फार्मा आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली.
परदेशी गुंतवणूकदारांनी 24 ऑक्टोबरपर्यंत 98085 कोटी रुपयांचे शेअर्स विकले –
एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी 5,062.45 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) 3,620.47 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) या महिन्यात 24 ऑक्टोबरपर्यंत 98085 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. आशियाई बाजारात सेऊल, शांघाय आणि हाँगकाँगमध्ये वाढ झाली, तर टोकियोमध्ये घसरण झाली. युरोपीय शेअर बाजार सकारात्मक क्षेत्रात व्यवहार करताना दिसले. गुरुवारी, बहुतेक अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाले.
जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.42 टक्क्यांनी वाढून $74.69 प्रति बॅरल झाले. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 16.82 अंकांनी किंवा 0.02 टक्क्यांनी घसरून 80,065.16 वर बंद झाला होता. अस्थिर व्यापारात निफ्टी 36.10 अंकांनी किंवा 0.15 टक्क्यांनी घसरून 24,399.40 वर बंद झाला होता.