मुंबई – शेअर बाजार निर्देशांक सध्या उच्चांकी पातळीवर आहेत. त्याचबरोबर काही राज्यात करोनाचे रुग्न वाढण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार खरेदीबरोबरच विक्री करीत असल्याचे वातावरण आहे.
दिवसभर आलेल्या खरेदी-विक्रीच्या लाटा नंतर शेअर बाजार निर्देशांकांत बुधवारी बऱ्यापैकी वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मानसिक दृष्टया महत्त्वाच्या 53 हजार पातळीच्या वर बंद झाला.
बाजार बंद होताना सेन्सेक्स कालच्या तुलनेत 193 अंकांनी वाढून 53,054 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 61 अंकांनी वाढून 15,879 या विक्रमी पातळीवर बंद झाला.
एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फिन्सर्व, नेस्ले, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. टायटन, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
दुपारच्या सत्रात धातु कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. त्याचबरोबर छोट्या खासगी कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.