Share Market Rally Reasons: भारतीय शेअर बाजारात आज 20 सप्टेंबर रोजी एक नवा इतिहास घडला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही आपापल्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्सने प्रथमच 84,000 ची पातळी ओलांडली आणि 84,695 अंकांचा नवा उच्चांक गाठला. निफ्टीनेही 25,849 ही नवीन विक्रमी पातळी गाठली.
व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 1,359.52 अंकांच्या वाढीसह 84,544.31 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 375.15 अंकांनी वाढून 25,790.95 च्या पातळीवर बंद झाला.
शेअर बाजारातील या विक्रमी वाढीमागे कोणती 5 महत्त्वाची कारणे होती? जाणून घ्या –
1. जागतिक बाजारपेठेत तेजी –
यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पाॅइंट्सची कपात केल्यानंतर जागतिक बाजारात तेजी दिसून आली. फेडरल रिझर्व्हने आणखी कपात करण्याचे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदारांची भावना उच्च राहिली. S&P 500 आणि Dow Jones निर्देशांकाने विक्रमी उच्चांक गाठला. आशियाई बाजारातही तेजी राहिली. त्याचे नेतृत्व जपानच्या निक्केई-225 निर्देशांकाने केले. जपानच्या मूळ ग्राहक किंमत निर्देशांकात 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2. व्याजदरात कपातीची अपेक्षा –
फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेवर दर कमी करण्याचा दबावही वाढू शकतो. अनेक विश्लेषकांचा असा विश्वास आहे की डिसेंबरच्या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) दर कमी करू शकते. या हालचालीमुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांना त्यांची आर्थिक धोरणे शिथिल करण्याची संधी मिळते, परंतु आरबीआय सध्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर आपले लक्ष केंद्रित करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
3. बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी –
निफ्टी बँक निर्देशांक सलग सातव्या दिवशी तेजीसह व्यवहार करत आहे. दिवसभरात 53,357 चा उच्चांक गाठला. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा यांसारख्या मोठ्या बँकांचे शेअर्स 1-2 टक्क्यांनी वाढले. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत हा निर्देशांक 4 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
4. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांचा परतावा –
गेल्या काही दिवसांतील नफावसुलीनंतर आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी जोरदार पुनरागमन केले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढले. याआधी गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने घसरण होत होती.
5. FII द्वारे संभाव्य खरेदी –
फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याने जागतिक बाजारपेठेत तरलता वाढेल. यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांची आवड आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.