मुंबई – जीएसटी संकलन वाढून 1.3 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येणे चालूच आहे. मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक वाढला आहे. या कारणामुळे सोमवारी शेअर बाजारात बरीच खरेदी होऊन निर्देशांकात मोठी वाढ नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 831 अंकांनी वाढून 60,138 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.46 टक्क्यांनी म्हणजे 258 अंकांनी वाढून 17,929 अंकावर बंद झाला.
जीएसटी संकलनात वाढ, पर्चेसिंग मॅनेजर इंटडेक्समध्ये वाढ आणि चीनमधील औद्योगिक उत्पादनात वाढ या कारणामुळे भारतीय शेअर बाजाराबरोबरच जागतिक शेअर बाजारांतही खरेदीचे वातावरण होते. गेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजार निर्देशांकांनी सपाटून मार खाल्ला होता. त्याची झीज काही प्रमाणात भरून निघण्यास मदत झाली आहे.
इंडसइंड बॅंकेचा शेअर सात टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर भारती एअरटेल, एचसीएल टेक, टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरीव वाढ झाली. मात्र या खरेदीच्या वातावरणातही महिंद्रा, बजाज फिन्सर्व, नेस्ले इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स वाढल्यामुळे कंपन्याची ऑर्डर वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.