सेन्सेक्‍स 40 हजारांवर

बायबॅकमुळे माहीती तंत्रज्ञान कंपन्या तेजीत

मुंबई – माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी बायबॅकचा धूमधडाका सुरू केला असल्यामुळे शेअर बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक आज सलग पाचव्या दिवशी वाढले.

जोरदार खरेदी होऊन मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 40 हजारांच्या पुढे गेला. बाजार बंद होताना हा निर्देशांक 303 अंकांनी म्हणजे 0.76 टक्‍क्‍यांनी वाढून 40,182 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 95 अंकांनी वाढून 11,834 अंकांवर बंद झाला.

टीसीएसबरोबरच इन्फोसिस, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बॅंक, सन फार्मा या कंपन्यांचे शेअर वधारले. मात्र ओएनजीसी, आयटीसी, पॉवरग्रीड, रिलायन्स, एशियन पेंट्‌स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.

लस उपलब्ध होण्याची शक्‍यता वाढल्यामुळे जागतिक शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय शेअर बाजारातील वातावरणही सकारात्मक असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले.

टीसीएसचे बाजार मूल्य वाढले

टीसीएस कंपनी 16 हजार कोटी रुपयांच्या शेअरचे बायबॅक करणार असल्यामुळे या आठवड्यात या कंपनीचा शेअर तेजीत आहे. आता या कंपनीचे बाजार मूल्य 10.59 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. काल या कंपनीने बाय बॅक करण्याचा निर्णय जाहीर केला.

विप्रो कंपनी बाय बॅक करणार

माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीही शेअरचे बाय बॅक करणार असून यासंदर्भात कंपनीचे संचालक मंडळ 13 ऑक्‍टोबर रोजी निर्णय जाहीर करणार आहे.यासंदर्भातील निर्णय संचालक मंडळ घेणार असल्याचे कंपनीने शेअर बाजारांना कळविले आहे. मात्र इतर तपशील दिला नाही. संचालक मंडळाने घेतलेला निर्णय शेअर बाजारांना कळविला जाणार आहे. त्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचे भाव 7.34 टक्‍क्‍यांनी वाढून 360 रुपयावर गेले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.