लातूर : बीडमधील मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असताना आता लातूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील वाडीशेडोळ येथील सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. महावितरणचा पोल रोवण्यावरून सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
वाडीशेडोळ येथील सरपंच रूबाब शेख आणि ग्रामसेवक सिमा माळी या ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठकीत बसले होते. त्यावेळी बासिद पठाण आणि वाजिद महेबुब पठाण हे दोघे कार्यालयात आले आणि आमच्या दारात महावितरणच्या लाईटचा पोल रोवू नका, असं म्हणाले. परंतु, ‘हा विषय महावितरण अंतर्गत येतो यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही’ असे ग्रामसेवक आणि सरपंच शेख सांगितलं.
यानंतर रूबाब शेख आणि त्यांचा मुलाला लाथाबुक्या आणि खुर्चीने जबर मारहाण करण्यात आली. तसंच, ग्रामपंचायत कार्यालयातील साहित्य खुर्च्या, टेबल, संगणकाची तोडफोड करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या प्रकरणी सरपंच रूबाब चाँदसाब शेख यानी निलंगा पोलीस ठाणे गाठून पोलिसाकडे शासकीय कामात अडथळा आणून जीवे मारण्याची धमकी जबर मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली. पण पोलिसानी तक्रार घेऊन कारवाई न करता टाळाटाळ केली. शिवाय शासकीय कामात अडथळा आणल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामसेवकाची फिर्याद असावी लागते म्हणून परत पाठवले.
थोड्यावेळानंतर ग्रामसेवक सिमा माळी या स्वत: ठाण्यात जावून तक्रार दिली. तरी देखील या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परंतु, सरपंचांनी तात्काळ संबंधित आरोपींवर कारवाई करून मला न्याय द्यावा मागणी केली आहे. पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा सरपंचाचा आरोप आहे.