Corona Vaccine : ज्येष्ठांना लस विकतही मिळणार; सरकारी रुग्णालयांमध्ये मात्र मोफतच

पुणे – करोना प्रतिबंधक लस तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांसाठी आता खासगी रुग्णालयांमध्येही विकत मिळणार आहे. त्याचे दर केंद्र सरकार ठरवणार असून, लसीसाठी “युजर शुल्क’मात्र संबंधित रुग्णालयांनी ठरवायचे आहेत. येत्या सोमवारपासून (दि. 1) तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण सुरू होणार आहे. यात सरकारी रुग्णालयांमध्ये मात्र ही लस मोफतच मिळेल.

“सिनियर सिटीझन्स’ आणि विविध आजारांनी ग्रस्ता 45 वर्षे वयांपुढील (कोम ऑर्बिडिटी) व्यक्तींचा समावेश आहे. या लसीची किंमत अद्याप सरकारने जाहीर केली नाही. येत्या दोन दिवसांत ती जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

“कोविन 2.ओ’ (कोविन टू डॉट ओ) हे ऍप केंद्राच्या आरोग्य विभागाने तयार केले आहे. सोमवारी ते लॉंच होईल. त्यात तपशील भरण्याचे प्रशिक्षण राज्य स्तरावरील कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. हे कर्मचारी जिल्हा आणि खासगी प्रतिनिधींना प्रशिक्षण देतील. यासाठी एक आठवडा लागू शकतो, अशी माहिती राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.

विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत म्हणजे “सीजीएचएस’, “आयुष्यमान भारत’, “पंतप्रधान जनआरोग्य योजना’, राज्याची “महात्मा फुले जनआरोग्य योजना’ अशा “योजनेतील लाभार्थ्यांनाही लस खासगी रुग्णालयांमध्ये मोफत मिळेल. मात्र रुग्णालयांचे “युजर चार्जेस’ त्यांना द्यावे लागतील. या योजनेंतर्गत लस देणाऱ्या खासगी रुग्णालयांची यादी केंद्राकडून जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

लस खरेदीसाठी स्वतंत्र अकाऊंट
खासगी रुग्णालयांना लस विकत घ्यायची असेल तर त्यांचे स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहे. त्यासाठी डिपॉझिट घेण्यात येणार आहे. याचीे गाईडलाइन केंद्र सरकारच ठरवेल.

महत्त्वाचे मुद्दे

  • खासगी रुग्णालयांना त्यांचे लसटोचक, अन्य कर्मचारी आणि पायाभुत सुविधा उभ्या कराव्या लागणार

  • लसीकरणावर नियंत्रासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक स्वराज्यसंस्था स्तरावर नोडल ऑफिसर नेमणार

  • फ्रंटलाइन आणि हेल्थकेअर वर्कर्सनाही खासगी रुग्णालयात विकतच लस घ्यावी लागणार.

  • खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ऍप वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार

रजिस्ट्रेशनसाठी लाभार्थ्यांनी काय करावे ?
– 60 वर्षे आणि त्यावरील वय असलेल्या व्यक्तींनी तसेच 45 वर्षे वयावरील आजारी व्यक्तींना ही लस घेता येणार आहे. या ऍपमध्ये त्यांना स्वत: रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

  • लसीकरण केंद्रावर जाऊन (ऑनसाइट) आयत्या वेळी रजिस्ट्रेशन करता येऊ शकेल. त्यावेळी उपलब्धतेनुसार लस घेताही येऊ शकते.

  • वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, फोटो आयडी किंवा वयाचा पुरावा असलेले अन्य कोणतेही सरकारमान्य ओळखपत्र अनिवार्य

  • 45 वर्षे वयावरील आजारी व्यक्तींसाठी सरकारने दिलेला तयार फॉर्म डाऊनलोड करून तो त्यांच्या फॅमिली फिजिशियन किंवा संबंधित डॉक्‍टरांकडून भरून घेऊन तो प्रमाणित करून सादर करावा लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.