सातारा -जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील करोनाबाधितांची संख्या पाचशेच्या वर गेल्याने धास्ती वाढली असताना जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा चौथा मजला लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी या मजल्यावरील सर्व विभाग बंद ठेवण्यात आले.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील बाधितांची संख्या पाचशेच्यावर तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने विविध उपाययोजना राबवल्या. मात्र, बाधितांची संख्या नियंत्रणात आली नाही. अनेक विभागांत करोनाचा शिरकाव झाला. रविवारी रात्रीच्या अहवालामध्ये जिल्हा परिषदेतील एक वरिष्ठ अधिकारी करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेतील चौथ्या मजल्यावरील सर्व विभागांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या मजल्यावरील सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारी दिवसभर चौथ्या मजल्यावर शुकशुकाट होता.