कोलकाता – संसदेच पावसाळी अधिवेशन लवकरच होत आहे. तथापि सध्याच्या करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या 65 वर्षावरील ज्येष्ठ खासदारांनी मात्र या अधिवेशनापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षातर्फे या विषयी कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नसला तरी 65 वर्षावरील खासदारांनी या अधिवेशनाला उपस्थित राहू नये असे त्यांना सुचवण्यात आले आहे.
पक्षाचे लोकसभेतील नेते सुदिप बंडोपाध्याय हे 67 वर्षांचे आहेत. त्यांनी दिल्लीला उपस्थित न राहण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की मी कोलकात्यात राहूनच पक्षाच्या खासदारांशी समन्वय साधणार आहे.
पक्षाचे दुसरे एक ज्येष्ठ सदस्य सौगत राय यांनी मात्र आपण हे अधिवेशन चूकवणार नाही असे म्हटले आहे. पक्षाने ज्येष्ठांना जाऊच नये असे बंधन घातलेले नाही. त्यांनी त्यांनी फक्त तसे सुचवले आहे. शेवटी अंतिम निर्णय पक्षानेच घ्यायचा आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.