पुणे – कुरिअर कंपनीची माहिती वेबसाईटवर शोधणे एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. त्याच्या मुलाच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेत सायबर चोरट्याने 92 हजाराचा गंडा घातला.
विलास गणपतराव देशमुखे(62, रा.कर्वेनगर) यांना एमएमसी इंन्फास्ट्रक्चर कंपनीकडून एक कुरिअर आले होते. ब्लू डार्ट कुरिअर कंपनीतर्फे ते पाठवले गेले होते. यासंदर्भात त्यांनी ब्लू डार्ट कंपनीच्या वेबसाईटवरुन माहिती घेतली. समोरच्या व्यक्तीने त्यांना दहा मिनीटात तुम्हाला कंपनीकडून फोन येईल असे सांगितले. त्याप्रमाणे त्याना एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांना दहा रुपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. त्यांनी ऑनलाईन मुलाच्या बॅंक खात्यावरुन हे पैसे भरले होते.
यानंतर त्यांच्या मुलाच्या बॅंक खात्याची माहिती घेतली. बॅंक खात्यातून 82 हजार रुपये भामटयाने वर्ग करुन घेतले. देशमुखे यांनी याबद्दल विचारणा केली असता, त्यांना पैसे परत पाठवतो असे सांगून पुन्हा त्यांच्या खात्यातून दहा हजार रुपये वर्ग करुन घेतले. यानंतर फोन बंद ठेवण्यात आला.
देशमुखे यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. त्याची तपास करुन गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत करत आहेत.