मुंबई – बॉलिवूडमधील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम यांना प्रकृती अस्वस्थ्य असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुफ्फुसाच्या त्रासाने प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर जुहू येथील सुजॉय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे.
92 वर्षांचे खय्याम यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बॉलिवूडमधील अनेक गाण्यांचे दिग्दर्शन खय्याम यांनी केले आहे. “कभी कभी’, “उमराव जान’, “त्रिशुल’, “नुरी’ आणि “शोला और शबनम’ अशा गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. ख्ययाम यांचा सामाजिक क्षेत्रातही मोठा सहभाग आहे. त्यांनी त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त 12 कोटींची रक्कम खय्याम प्रदीप जगजीत या संस्थेला दिली होती.
दरम्यान, पंजाबमधील नवांशहर येथे जन्म झालेल्या खय्याम यांनी 1947 साली करिअरची सुरुवात केली. 200 रुपयांची पहिली कमाई करणाऱ्या खय्याम यांना “कभी कभी’ आणि उमराव जान’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच संगीत नाट्य अकादमी पुरस्कार आणि पद्म भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.