पुणे : झोपण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 76 वर्षीय ज्येष्ठाने गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील म्हाडा कॉलनी समर्थनगर येथे मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दोन दिवसापूर्वी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रामदास दगडू वाघमारे (वय 45, रा. म्हाडा कॉलनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीराम दगडू वाघमारे (वय 55,रा. शिराढोण, ता. कळंब, ज़ि उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार अशोक बाबुराव देवडे (वय 76, रा. बिल्डिंग क्र.6 म्हाडा कॉलनी हडपसर) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रामदास वाघमारे हे फिर्यादींचे लहान भाउ होते.
म्हाडा कॉलनीमध्ये समर्थ नगर भागात मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड आहे. रात्रीच्या वेळी परिसरातील लोक त्या शेडमध्ये जावून झोपतात. दोन दिवसापूर्वी झोपण्यासाठी जागा देण्यावरून रामदास वाघमारे आणि अशोक देवडे यांच्या मध्ये भांडणे झाली. त्याचा राग मनात ठेवून खून केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे करीत आहेत.