अहमदाबाद – गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी कॉंग्रेसमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी स्वगृही परतण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकेकाळी गुजरातमधील प्रभावी नेते अशी ओळख असणाऱ्या 80 वर्षीय वाघेला यांचे राजकीय वजन स्वतंत्र चूल मांडल्याने घटल्याचे चित्र आहे.
वाघेला सुमारे दोन दशके कॉंग्रेसमध्ये होते. त्यांनी गुजरातेत 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्या पक्षालाही त्यांनी मागील वर्षी सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी प्रजाशक्ती लोकशाहीवादी पक्षाची स्थापना केली.
मात्र, त्या पक्षाचे गुजरातेत फारसे राजकीय अस्तित्व दिसत नाही. आता एक निवेदन जारी करून वाघेला यांनी कॉंग्रेसमध्ये परतण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे. कॉंग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मला स्वगृही येण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे विनाअट कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश करण्याची माझी इच्छा बळावली आहे.
मी लवकरच दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेईन. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.