पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला केल्या महत्वाच्या सूचना
पुणे : कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्यायला हवेत, अशा सूचना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केल्या.
कोविड 19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन सभागृहात आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी खासदार पवार बोलत होते.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन खासदार शरद पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
खासदार शरद पवार म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृती भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. बरेच नागरिक मास्कशिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्कशिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, अशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.
खासदार शरद पवार म्हणाले, मॉल, बसस्थानक, रेल्वे स्थानक, मोठी दुकाने याठिकाण च्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी बंधनकारक करावी. बांधून तयार असणाऱ्या इमारतींचा उपयोग कोविड उपचार केंद्रासाठी करता येऊ शकेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.