नवी दिल्ली : लष्कर ए तोयबाच्या एका वरिष्ठ कमांडरची पाकिस्तानमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. झिया-उर-रेहमान उर्फ नदीम उर्फ अबू कताल उर्फ कताल सिंधी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांततातल्या झेलम भागात त्याला अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केले. या हल्ल्यामध्ये कतालचा सुरक्षा रक्षक देखील मारला गेला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानातून मिळालेल्या माहीतीच्या आधारे हे वृत्त प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
रेहमान हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर होता. जम्मू काश्मीरमध्ये घातक दहशतवादी हल्ले केल्याच्या आरोपाखाली त्याला भारतातल्या तपास अधिकाऱ्यांनी वॉन्टेड म्हणून घोषित केले होते. रेहमान हा मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा सर्वात विश्वासू सहकारी मानला जात होता. जम्मू काश्मीरमधील पूंछ-राजौरी भागांमध्ये करण्यात आलेल्या विविध घातपाती कारवायांची आखणी करण्यात रेहमानचा मुख्य सहभाग होता.
रेहमानने २००० साली जम्मू भागात घुसखोरी केली होती. त्याला २००५ मध्ये तेथून बाहेर काढण्यात आले होते. त्यानेआपल्या जुन्या संपर्काच्या आधारे पूंछ आणि राजौरी भागामध्ये आपल्या हस्तकांचे मोठे नेटवर्क उभे केले होते. एनआयएने पूंछ-राजौरीमधील दहशततवादी हल्ल्यांचा तपास केल्यावर या हल्ल्यांमधील रेहमानचा सहभाग उघड झाला होता.
दिनांक ४ फेब्रुवारी १९८२ रोजी पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात जन्मलेला रेहमान हा पाक व्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्यातल्या कुइराट्टा गटाचा प्रमुख होता. पीओके आणि सिंध मधील दहशतवाद्यांचा तो मुख्य दुवा होता. – रियाज अहमद उर्फ अबू कासिम आणि हंजला अदनान हे रेहमानचेनिकटचे सहकारी सप्टेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये मारले गेले आहेत. गेल्या ३ वर्षात पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून मारले आहेत.
विविध हल्ल्यांमागील सूत्रधार
राजौरी जिल्ह्यातल्या धांगरी गावातल्या हिंदूंवर २०२३ मध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल त्याच्यावर एनआयएने आरोपपत्र देखील दाखल केले होते. दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी त्याने धांगरी गावात आयइडी पोचवले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार झाले होते. तर दोघेजण दुसऱ्या दिवशी झालेल्या आयइडीच्या स्फोटात ठार झाले होते.
या दोन्ही हल्ल्यात १४ जण जखमी झाले होते. दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान मोदींच्या शपथविधीच्या दिवशी घडवलेल्या रायसी बस हल्ल्याचा सूत्रधारही रेहमान हाच होता. या हल्ल्यात ९ यात्रेकरू ठार जर ४१ जण जखमी झाले होते. /शिवाय २० एप्रिल २०२३ रोजीचा भट्टा डुरियन हल्ला आणि ५ मे २०२३ रोजीचा कांडी येथे निमलष्करी दलाच्या जवानांवरील हल्ल्यामागेही त्याचाच हात होता.