बंगळूर : ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांचे मंगळवारी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता शाहरूख खान याच्या स्वदेश चित्रपटातील भूमिकेमुळे त्या हिंदी चित्रपटरसिकांसाठीही परिचित आहेत. वयाशी निगडीत आजारांमुळे त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रामुख्याने कन्नड चित्रपटसृष्टी हे किशोरी यांचे कार्यक्षेत्र असले तरी विविध भाषिक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या नावावर सुमारे 75 चित्रपट जमा आहेत. काही बॉलीवूड चित्रपटांतही त्यांनी काम केले. त्यातील स्वदेसमधील कावेरी अम्माची त्यांची भूमिका गाजली. किशोरी यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. शाहरूख आणि स्वदेसचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.