पुणे – ग्लोबल पुलोत्सवांतर्गत दिला जाणारा “पु. ल. स्मृती सन्मान’ यंदा ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना, तर “पुलोत्सव जीवनगौरव’ पुरस्कार अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. बालगंधर्व रंगांदिर येथे होणाऱ्या ग्लोबल पुलोत्सवाचा समारोप सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने “आशय सांस्कृतिक’ व स्क्वेअर ने वर्षभर आयोजित केलेल्या ग्लोबल पुलोत्सवाचा समारोप सोहळा दि.8 ते 11 नोव्हेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिर, म.सा.प. आणि “आयुका’ येथे होणार आहे. यानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरणदेखील करण्यात येणार आहे.
यामध्ये पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना “पु. ल. स्मृती सन्मान’, अशोक सराफ यांना “पुलोत्सव जीवनगौरव’, सामाजिक कार्यकर्त्या रेणू दांडेकर यांना “पुलोत्सव कृतज्ञता सन्मान’, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना “विशेष सन्मान’ तर अभिनेते लेखक चिन्मय मांडलेकर यांना “तरुणाई सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, आयुकाचे सुहृद, सतीश जकातदार, स्क्वेअरचे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या समारोप सोहळ्यादरम्यान गीत सादरीकरण, परिसंवाद, एकपात्री प्रयोग असे विविध कार्यक्रम होणार आहे. हा ग्लोबल पुलोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून महोत्सवाच्या प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध असतील.