Congress president election : कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणूक रिंगणात पक्षाचे मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष कमल नाथ ( kamal nath ) उतरू शकतात, अशीही कुजबूज सुरू होती. मात्र, स्वत: नाथ यांनी अध्यक्ष बनण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले. मध्यप्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेशवरच माझा फोकस असेल. दिल्लीत सोनियांची भेट घेऊन त्यांना मी माझी भूमिका सांगितली.
राहुल ( rahul gandhi ) यांच्याशीही माझे फोनवरून बोलणे झाले. सध्याचा गोंधळ संपवण्यासाठी त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती मी केली. पण, राहुल यांनी स्पष्ट नकार दर्शवला, असे नाथ यांनी भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आदेश मिळाल्यास खर्गे तयार ( Congress president election )
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांच्याकडेही संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. सोनियांनी आदेश दिल्यास निवडणूक लढवण्यास खर्गे तयार असल्याचे समजते. पक्षाने निर्णय घेतल्यास त्यास बांधील राहू अशी भूमिका खर्गे यांची असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
नेहरू-गांधी परिवाराचे निष्ठावंत म्हणून खर्गे यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासारख्या विरोधकांच्या गोटातील प्रमुख नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्या बाबी खर्गे यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात.