नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने वाहतूक व्यवस्थाही ठप्प आहे. त्यामुळे पेन्शन घेण्यासाठी ज्येष्ठांना थेट डाकघरपर्यंत पोचण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठांना थेट घरपोच पेन्शन देण्याचा निर्णय डाकघरचे घेतला असल्याची माहिती डाकघर कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले यांनी दिली.
वाहतुकीची साधनेच बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी डाकघर कार्यालयाने हा उपक्रम सुरु केला. ज्येष्ठ तसेच दिव्यांग नागरिकांनी या योजनेबद्दल डाकघरचे विशेष आभार मानले आहेत. या योजनेमुळे दोन्ही घटकांना मोठाच दिलासा मिळाला.
डाक विभागातील ग्रामीण भागामध्ये जे विविध राष्ट्रीयकृत बॅंकाचे ग्राहक आहेत. ज्यांचे खाते आधार संलग्न आहे. त्यांना देखील लॉकडाऊन परिस्थितीमुळे त्यांचे बॅंक खात्यातील पैसे काढण्यास अडचण निर्माण होत आहे, अशा ग्राहकांना देखील तेथील संबंधीत पोस्टमनमार्फत एका वेळेस दहा हजार रुपयांपर्यंत आधार संलग्न प्रणालीद्वारे पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे, अशा परिस्थितीत नगर डाक विभागातील अत्यंत वयस्कर व अंपग पेन्शनर यांच्यासाठी घरपोच पेन्शन देण्याची व्यवस्था केली आहे, अशा पेन्शन धारकांनी त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा.