स्वारगेट व शिवाजीनगर येथे एकच खिडकी असल्याने रांगा
पुणे – एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्याची मुदत तीन महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे. मात्र, स्वारगेट व शिवाजीनगर आगारात स्मार्ट कार्डसाठी एकच खिडकी असल्याने ज्येष्ठ नागरिक तासन्तास रांगेत थांबत आहेत. सध्या पुणे विभागातील 55 हजार 46 सवलतधारकांनी स्मार्ट कार्डची नोंदणी केली आहे. मात्र, आगारात स्मार्ट कार्ड मिळण्याची प्रक्रिया जलद करण्याची मागणी केली जात आहे.
राज्यातील 250 आगारांमध्ये स्मार्ट कार्ड काढून दिले जात आहे. पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे विभागातील 13 आगारांसह एकूण 102 केंद्रांमध्ये स्मार्ट कार्ड काढून दिले जाते. मात्र, स्मार्ट कार्ड काढून देण्यासाठी आगारात केवळ एकच खिडकी ठेवण्यात आली आहे.
स्वारगेट आगारात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एकच खिडकी आहे. या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसांत स्मार्ट कार्ड येईल, असे सांगण्यात आले असून प्रत्यक्षात महिना उलटूनही कार्ड मिळालेले नाही.
– शांताराम परकाळे, ज्येष्ठ नागरिक
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आगारांमध्ये स्मार्ट कार्ड देण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, तरीदेखील बहुतांश ज्येष्ठ नागरिक स्वारगेट आगारातच येत असून गर्दी वाढत आहे.
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, पुणे विभाग, एसटी महामंडळ