पिंपरी, (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त नाट्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील राज्य व स्थानिक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.
यंदापासून नाट्य चित्रक्षेत्रातील जेष्ठ कलावंताला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. यंदाचा पहिला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य- चित्र अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्याचे निश्चित झाले आहे.
येत्या ९ ऑगस्टला संध्याकाळी ५.३० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सोहळा पार पडणार आहे. संघटनेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर अजित भुरे हे रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
याबरोबरच प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, अभिनेता पंकज चव्हाण, अभिनेत्री कोमल शिरभाते, लावणी नृत्यांगना आशा रुपा परभणीकर व नाट्यकर्मी नटराज जगताप यांच्यासह इतर कलावंतांना गौरविण्यात येणार आहे. तसेच विधानपरिषदेवर नुकतीच नियुक्ती झालेले कलाप्रेमी अमित गोरखे यांचा विशेष सत्कार होणार आहे.