मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. आज सकाळी त्यांच्या गावदेवीतल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातून त्यांना दोनच दिवसांपूर्वी घरी आणले होते. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. शोले, अंदाज अपना अपना यासह सुमारे ३०० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. विशेषतः त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या होत्या.