निरोप

बंदीस्त पिंजरा वाटावा अशी कॉलेज लाइफ चालू असताना कधी एकदाचे या पिंजऱ्यातून मुक्त होऊ असे वाटत असायचे. या बंदीस्त आणि नियमावलीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून कधी एकदा मोकळा श्‍वास मिळेल? बघता बघता वर्ष सरली. पाखरांना मात्र या पिंजऱ्याचीच सवय झालेली.

एखाद्या ठिकाणी दीप प्रज्वलन झाल्यावर आरती करुन भाग्य जसे उजळावे अगदी तसेच घडले या कॉलेज लाइफमधे. ज्या गोष्टींबद्दल कधिही कुतुहल नव्हते त्याच गोष्टी हव्या हव्याशा झाल्या. पिंजरा जरी एक असला तरिही त्याचे भागीदार किती ना? ते म्हणतात ना गुण जुळले की लग्न जमते आणि अवगुण जुळले की मैत्री जमते. तसेच झाले फक्त. अवगुण जुळल्यामुळे सगळ्यांचीच मैत्री इतकी घट्ट जमली की त्याचमुळे कॉलेज लाइफ हवी हवीशी झाली.

या कॉलेज लाइफमधून फ्रिडम हवे म्हणणारे मात्र आता सगळेच गप्प झाले. आयुष्याच्या या वाटेवर सगळे काही असेच चालते. जि माणसे नकोशी असतात त्यांचा सहवास सुटता सुटत नाही तसेच जे काही खुप हवेसे असते ते सहजा सहजी मिळत नाही. कॉलेज लाइफ संपत आल्यावर एवढे मात्र नक्कीच समजले की आयुष्यातील या सगळ्यात महत्वाच्या प्रसंगात आणि सगळ्यात भारी घटनेत जास्त वेळ कोणावरही रागवू नये, आपण आपल्या मैत्रीचा आणि वेळेचा आदर नेहमी करावा. हे ज्याला समजले कदाचित तोच सगळ्यात जास्त सुखी, समाधानी..

कॉलेज लाइफने एवढे मात्र नक्कीच शिकवले. आयुष्यात आपल्याला हवे तसे बिंधास्त जगायचे, जगाचा विचार करायचा नाही, जगाचा विचार केला तर संपला. जितके जमेल तितके सर्वांशी चांगले वागायचं. लोकांचं काय? लोक देवाला पण नाव ठेवतात. तशीच प्रत्येकाची वेगळी रुप असतात. कॉलेज लाइफ जगताना मात्र आपल्यासाठी घाम गाळणाऱ्या आई वडीलांचा विचार नक्कीच करावा. आपले चांगले दिवस यावेत म्हणून त्यांनी वाईट दिवस पाहिलेले असतात. अखेर तो दिवस आलाच,ज्या दिवसाची सगळेच वाट पहात होते. पण ज्या कारणामुळे वाट पहिली तेच नकोसे होते. कोणालाच या पिंजऱ्यातून निरोप नको होता. कधी काळी आपण यातून मुक्त होवू अशी इच्छा करत होतो पण आज खरोखरच मुक्त होण्याची वेळ आल्यावर का हे नकोसे झाले?

आता प्रत्येकाला वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या वाटेला जायचं आहे, त्याचच हे दु:ख. कशाला हा निरोप? नकोसा आहे हा. रोज रोज दिसणारे चेहरे इथुन पुढे दिसणार नाहीत त्याचीच ही निराशा. होय. फक्त मैत्री आणि त्यातील प्रेमापोटी हा निरोप नकोसा झाला. हवे हवेसे असणारे मित्र मैत्रिणी आता दिसणार नाहीत याचाच स्वप्न भास झाला.

आयुष्याच्या या वाटेवर असेच क्षण येत असतात. या कॉलेज लाइफचा निरोप घेत असताना एक सुचते… येताना रिकामे आलो असलो तरीही आता खुप आठवणी घेवुन जात आहे, पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा प्रत्येक क्षण आता भासत आहे. आपल्याला हवी हवीशी असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असे काही नाही, परंतू जे काही मिळाले आहे त्यातच सुखी, आनंदी राहण्यात समाधान आहे. त्यामुळेच झालेल्या गोष्टी आठवणीत ठेवून आनंदाने हसत हसत निरोप घेवू…

– विकास भोरडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.