पुणे – जिल्ह्यातील हेरिटेज वास्तू व पर्यटन स्थळांचे सौंदर्य वाढवून याठिकाणी पर्यटन विकासाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधांसाठी लागणाऱ्या निधीचा सविस्तर प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर शासनाकडे सादर करावा, जेणेकरून निधीची तरतूद करणे सोयीचे होईल, असे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे म्हणाले की, पुणे जिल्ह्यात शिवनेरी, सिंहगड, शनिवारवाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तू व महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. याठिकाणी विविध उपक्रम राबवून त्यांचे जागतिक पातळीवर महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हवा, पाणी आदी घटकांचे प्रदूषण रोखणे आवश्यक आहे.
पुण्यात लोकसहभागातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून “प्लॅस्टिक पिशवीमुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. सिंगल युज प्लॅस्टिक वापरास पूर्ण बंदी असल्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होईल. तथापि, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक पाऊच याबरोबरच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापनावर भर द्या, अशा सूचना त्यांनी केल्या.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन व मलनिस्सारण प्रकल्प राबवावेत. पाणी प्रदूषण रोखण्यासाठी येथील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्यांच्या स्वच्छतेवर भर देऊन जायका प्रकल्प प्रभावीपणे राबवावा, तसेच पर्यटन व पर्यावरण विषयक विकास कामांना गती द्यावी, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या.