Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana | राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यातच सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मात्र आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी यावरुन केलेले वादग्रस्त विधान चांगलेच चर्चेत आले आहे.
‘लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करू,’ असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे. या विधानानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी चक्क ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरुन महिलांना जाहीर सभेत स्टेजवरुन दम भरली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हंटले की, ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत दिसले. तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला १५०० रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं असं अजिबात चालणार नाही.”
पुढे ते म्हणाले, “अनेक ताई आहेत ज्या छात्या बडवून सांगत आहेत की, आम्हाला या योजनेचे पैसे नकोत. जर पैसे नको असतील, तर राजकारण का करताय? ज्यांना या योजनेचे पैसे नकोत, त्यांना म्हणायचं या फॉर्मवर सही करा उद्यापासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद होतील.” त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. pic.twitter.com/OQGxSjYcLy
— Dhananjay Mahadik (@dbmahadik) November 9, 2024
धनंजय महाडिक यांंनी मागितली माफी
”माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना चुकून आलेली प्रतिक्रिया आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेसने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. ‘व्होट जिहाद’ करणाऱ्या महिलांबाबत स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मी माझ्या राजकीय, वैयक्तिक आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलो आहे,” असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांसाठी या योजनाना घेऊन महायुतीतील प्रत्येक उमेदवार आणि नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत. महायुती महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देत आहे. तर आताच्या जाहीरनाम्यात महायुतीचं सरकार आलं तर २१०० रुपये देणार असल्याचं म्हटलं आहे. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांचं सरकार आलं तर दर महिन्याला ३००० रुपये देण्यार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटले आहे.
हेही वाचा:
ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू