सांगली – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू असलेली जुगलबंदी कायम आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वळविल्याचं चित्र आहे.
जयंत पाटील यांना आगामी 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू, असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी केला. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. पाटील यांनी इस्लामपूर येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल याठिकाणी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा परमेश्वराने एक आशिर्वाद दिलाय. कार्यकर्ते सोबत असतील तर 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. आपण आपल्यात एकजुट ठेवली असती तर ते गेल्या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे एकजुटीने काम करू असा निर्धार पाटील यांनी बोलून दाखवला.