पुणे-“टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती सोमवारपर्यंत पाठवा

पुणे – पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानितच्या सर्व शाळांमध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती 25 मार्च पर्यंत पाठवा, असे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी बजाविले आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी शिक्षकांना “टीईटी’ उत्तीर्ण होण्याची सक्ती घालण्यात आली आहे. डी.टी.एड.,बी.एड.स्टुडंटस असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शासनाकडून त्यावर प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार राज्यामध्ये “टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती न्यायालयात सादर करणे आवश्‍यक आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी पंचायत समितीचे सर्व गटशिक्षण अधिकारी यांना अनेकदा माहिती पाठविण्याबाबतचे आदेश बजाविले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती पाठविण्याला प्रतिसादच देण्यात आला नाही. त्यामुळे आता पुन्हा माहिती मागविण्याची वेळ आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.