मुलांना शाळेत पाठवू; पण करोना कमी झाल्यावरच

83 लाख पालकांचा होकार : शिक्षण विभागाचा अहवाल

पुणे – राज्यात करोनाच्या संकटामुळे वर्षभर शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या. आता करोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतर मुलांना नियमितपणे शाळेत पाठविण्यासाठी 83 लाख 22 हजार 990 पालकांनी होकार दर्शविला आहे. शालेय शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षण अहवालातून ही बाब उघड झाली आहे.

गेल्या वर्षातील मार्चपासून करोनाचा प्रादुर्भाव अद्याप ही कायम आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळा बंदच ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात आले होते. शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने इतरही माहिती जमविली आहे. त्यावरून अहवालही तयार करण्यात आले असून, शैक्षणिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे.

कुटुंबाच्या सर्वसाधारण माहितीचे संकलनही करण्यात आले आहे. राज्यात 3 ते 18 या वयोगटात एकूण 1 कोटी 71 लाख 6 हजार 234 बालके आढळून आली आहेत. अंगणवाडीत, बालवाडीत, शाळेत दाखल झालेली बालके 1 कोटी 68 लाख 84 हजार 315 आढळली आहेत. विशेष गरजाधिष्ठित बालके ही 1 लाख 31 हजार 986 आहेत. त्यातील 1 लाख 26 हजार 563 बालके शाळेत प्रविष्ट झालेली आहेत.

करोनाच्या संकटामुळे इयत्ता पहिली ते पाचवीची 45 लाख 67 हजार 144 बालके शाळेत जाऊ शकले नाहीत. तसेच इयत्ता सहावी ते आठवीची 15 लाख 47 हजार 175 तर इयत्ता नववी ते बारावीची 13 लाख 15 हजार 865 मुले शाळेत जाऊ शकली नाहीत.

पुणे जिल्ह्यात 5 लाख संख्या
पुणे जिल्ह्यात 13 लाख 43 हजार 452 बालके आहेत. त्यातील 13 लाख 17 हजार 140 शाळेत दाखल आहेत. विशेष गरजाधिष्ठित 7 हजार 565 बालके असून, त्यातील 7 हजार 44 शाळेत प्रविष्ट आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पहिली ते पाचवीची 2 लाख 44 हजार 329 तसेच सहावी ते आठवीची 1 लाख 712, नवीन ते बारावीची 96 हजार 525 मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. करोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर 4 लाख 99 हजार 655 पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.