सहामाहीचा अभ्यासक्रम संपता संपेना!

विद्यार्थी-शिक्षकांवर ‘एक्स्ट्रा क्लास’ चा ताण, सुट्ट्या जास्त झाल्याने दमछाक

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून शहरातील बहुतेक शाळांमध्ये “एक्‍स्ट्रा क्‍लास’चा ताण जाणवत आहे. यावर्षी पूर परिस्थितीमुळे जाहीर कराव्या लागलेल्या सुट्ट्या, लवकर आलेली दिवाळी, रविवार सोडून आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या त्यातच “इलेक्‍शन ड्युटी’ यामुळे प्रथम शैक्षणिक सत्रातील अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकांसमोर मोठे आव्हान बनले आहे. काही शाळांनी अतिरिक्‍त तास घेऊन अभ्यासक्रम अक्षरशः “पळवला’ आहे. 10 ऑक्‍टोबरपासून सहामाही परीक्षा सुरु होत असल्याने विद्यार्थ्यांनाही आता अतिरिक्‍त अभ्यासाचा ताण जाणवत आहे.

यावर्षी 15 जूनपासून प्रथम शैक्षणिक सत्र सुरू झाले. परंतु प्रथम शैक्षणिक सत्रात बहुतेक सुट्ट्या या शनिवार, रविवार सोडून आल्या. यावर्षी शासनाने शाळांना उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांच्या प्रसंगी घेण्याची परवानगी दिली आहे. परंतु सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 पेक्षा अधिक नसाव्यात, अशीही अट आहे. त्याचप्रमाणे नियमानुसार कामाचे किमान दिवस 230 असणेही आवश्‍यक आहे. त्यानुसार, पहिल्या शैक्षणिक सत्रात किमान 100 ते 110 दिवस शाळा भरणे गरजेचे होते. परंतु, दरवर्षीच्या तुलनेत लवकर आलेली दिवाळी, शहरात आलेल्या पूर व अतिवृष्टीमुळे देण्यात आलेल्या सुट्ट्या आणि इतर सार्वजनिक सुट्ट्यांमुळे विविध शाळांमध्ये 81 ते 87 दिवसच शाळा भरु शकली.

दहा सुट्ट्या या सोमवार ते शुक्रवार दरम्यान आल्या. तसेच दर महिन्यातील शनिवार, महिनाअखेरीस अर्धवेळ शाळा असल्याने अध्यापनाचे तासही कमी झाले. दहावीचे महत्त्वाचे वर्ष असते, दहावीच्या परीक्षा इतर इयत्तेच्या तुलनेत आधी असतात. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळतो. यावर्षी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दहावीच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही टेन्शन निर्माण झाले आहे.

पुराचाही फटका
शहरात 4 ऑगस्ट रोजी आलेल्या पुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शहरातील काही भागातील शाळांना एक ते दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. पूरग्रस्त नागरिकांना महापालिकेच्या तसेच खासगी शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. यामुळे अशा शाळा सुरू होण्यास जवळपास चार दिवस लागले. काही शाळांमध्येही पाणी शिरले होते. तिथे स्थिती पूर्ववत होण्यास जवळपास एक आठवडा गेला. याचा मोठा फटका शाळांना बसल्याने अभ्यासक्रम पुर्ण करता आला नाही.

शाळांनी लढविली शक्‍कल
“एक्‍स्ट्रा क्‍लास’चे प्रयत्न करुनही पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याने काही शाळांनी सहामाहीसाठीचा अभ्यासक्रम कमी केला आहे. सहामाहीसाठी पहिल्या दहा धड्यांवर परीक्षा होणार असेल तर ते कमी करुन आठच धड्यांवर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित दोन धडे दुसऱ्या सत्रात जोडण्यात येणार आहेत. यामुळे आता ताण कमी जाणवत असला तरी दुसऱ्या सत्रातही दिवाळीच्या धरुन तब्बल 23 सुट्ट्या असणार आहेत. त्यातच गॅदरिंग, सहल व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील वेळ जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.