पुणे – शाखास्तरीय कार्यक्षमता सुधारण्यासाठी भारतातील अग्रगण्य राष्ट्रीयीकृत बॅंक असलेल्या अलाहाबाद बॅंकेने कर्मचाऱ्यांचे चर्चासत्र आयोजित केले. बॅंकेने पुणे विभागातील सर्व शाखांची बैठक 18 आणि 19 ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. याला बॅंकेचे उपमहाप्रबंधक व नियोजक विनय दीक्षित व श्रीकृष्ण व्होटा यांनी मार्गदर्शन केले. या चर्चेवेळी शाखास्तरावरील अधिकाऱ्यांकडून बॅंकेचा व्यवसाय वाढावा व कार्यक्षमता वाढावी याकरिता नवीन कल्पना व पर्याय सूचविण्यात आले. यावेळी बॅंकांच्या शाखातील मागील 5 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्या क्षेत्रातील अडचणी जाणून घेण्यात आल्या.
तळागाळातील लोकांना बॅंकिंग सेवा घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच दैनंदिन क्षेत्रातील अडचणींवर पर्याय सूचविणे व भविष्यात बॅंकेचा व्यवसाय वाढण्यासाठी काय करता येईल यावर कर्मचाऱ्यांकडून पर्याय सूचविण्यात आले. शासकीय योजनांना संलग्न असलेल्या बॅंकेच्या विविध योजना आणि त्यांचा विस्तार याबद्दल समीक्षा करण्यात आली. यात पुणे विभागातील सर्व शाखा प्रमुखांनी सहभाग घेतला व या कामकाजाचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार आहे. त्या आधारावर शाखांच्या कामगीरीचे मुल्यांकन केले जाण्याची शक्यता आहे.