लंडन – यंदाच्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी धडक मारली आहे. क्रिकेट विश्वचषकात सातवा विजय मिळवत आणि श्रीलंकेच्या संघाला पराभूत करत भारताच्या संघाने गुणतालिकेतही बाजी मारली आहे.
विश्वचषक स्पर्धेत काल पार पडलेल्या अखेरच्या सामन्यानंतर गुणतालिकेत सुध्दा बदल पहायला मिळाला. भारताने श्रीलंकेला तर द.आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. कालच्या सामन्यानंतर भारत 15 गुणांसह अव्वलस्थानी पोहचला आहे. तर त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया (14), इंग्लंड (12) आणि न्यूझीलंड (11) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत, त्यामुळे आता उपांत्य फेरीतील लढतीचं चित्र सुध्दा स्पष्ट झालं आहे. पहिली लढत भारत-न्यूझीलंड तर दुसरी लढत ऑस्ट्रेलिया-इंग्लंड अशी रंगणार आहे.
विश्वचषकात 9 जुलै या दिवशी मँचेस्टर तर, 11 जुलै रोजी बर्मिंघम येथे हे सामने पार पडणार आहेत. तर, 14 जुलै रोजी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे.
The #CWC19 semi-finals are confirmed! 👊 pic.twitter.com/rpnOaeWAzr
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) July 6, 2019
पहिला उपांत्य सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड, मंगळवार, 9 जुलै 2019
श्रीलंकेच्या संघाला पराभूत करत भारताच्या संघाने गुणतालिकेतही बाजी मारली. गुणतालिकेत प्रथम स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाचं आव्हान असणार आहे . मंगळवारी हा सामना पार पडणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म पाहता न्यूझीलंडच्या संघापुढे हे एक आव्हान असणार आहे.
दुसरा उपांत्य सामना
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गुरुवार, ११ जुलै
रविवारी पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघास दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकारावा लागला, त्यामुळे गुणतालिकेत त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांची उपांत्य फेरीतील लढत ही इंग्लंडविरूध्द होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा उपांत्य सामनाही पाहण्याजोगा असेल. दोन्ही संघांमध्ये असणारी स्पर्धा पाहता प्रत्येक खेळाडूचं कौशल्य पणाला लागणार आहे.