पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाला पहिल्या चार दिवसांत तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये नागरिकांनी तब्बल पाच लाख पुस्तके खरेदी केली. त्यामुळे यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव नागरिकांच्या चांगला पसंतीस उतरला आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे. सर्व पुस्तकांच्या खरेदीवर १० टक्के सवलत असून, यंदा २२ भारतीय भाषांमधील सुमारे १२ लाख पुस्तके खरेदीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांना एतिहासिक विषयांपासून ते विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित पुस्तके मिळत आहे. लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे पालक आवर्जून पुस्तकांची खरेदी करीत आहेत.
पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे पुणे बाल चित्रपट महोत्सवात दररोज दर्जेदार चित्रपट दाखविण्यात येत आहे. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात लघुपट, ॲनिमेशन चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
बट व्हॉट डज सायन्स सेचे प्रकाशन
वाढदिवसाला भरभरून साखर असलेल्या केकसह गोडाधोडाचे खाद्यपदार्थ लोक आवडीने खातात; परंतु प्रथिने खाणे चांगले की वाईट, ते विचारतात. वास्तविक सर्व वयोगटांतील व्यक्तींनी प्रथिनांचे सेवन केले पाहिजे, असे सांगत प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ आणि क्रीडा वैद्यक तज्ज्ञ डॉ. मनन व्होरा यांनी वाचकांना निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले. पुणे पुस्तक महोत्सवात लिटररी कॉर्नर येथे डॉ. मनन व्होरा लिखित बट व्हॉट डज सायन्स से या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी डॉ. व्होरा यांनी वाचकांशी संवाद साधला.