पिंपरी – भारतीय जनता पक्ष हा पूर्वी विचारधारेवर चालणारा पक्ष होता. मात्र शहरातील काही स्वार्थी मंडळींनी स्वत:च्या फायद्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा वापर चालविला आहे, अशा परखड शब्दांत भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील विभागीय कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त लांडगे आले होते. त्यावेळी डिजिटल प्रभातसाठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये चाललेल्या चुकीच्या गोष्टींना प्रखर शब्दात विरोध केला. तसेच काही स्वार्थी लोकांमुळे पक्ष अडचणीत आल्याची टीका केली. यावेळी बोलताना रवी लांडगे म्हणाले, भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे कै. अंकुशभाऊंनी शहरात रुजविली. पक्षाची विचारधारा याला महत्व देत सर्वांना विचारात घेऊन संघटनेची बांधणी केली. पूर्वी पक्षात सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतले जात होते. जबाबदारीही तशीच निश्चित केली जात होती.
मात्र, काही वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या काही स्वार्थी मंडळींनी पक्षाची विचारधाराच संपुष्टात आणली आहे. विचारांनी चालणारा भाजप मागे पडले असून स्वार्थी व्यक्तींना महत्त्व प्राप्त झाले आहे. या लोकांनी पक्षाचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा वापर चालविला असून त्याचा फटका नक्कीच बसेल, अशी भितीही व्यक्त केली.
वॉर्डातील विकासकामांबाबत बोलताना लांडगे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमचा वॉर्ड गोरगरीब, कष्टकरी आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा रहिवाशी भाग आहे. रेडझोन, आरक्षणे, प्राधिकरण आणि काही महापालिकेचे क्षेत्र मिळून वॉर्डाची रचना आहे. या प्रभागात रहात असलेल्या प्रत्येक नागरिकाला प्राथमिक सुविधा मिळवून देण्यासाठी यापुढेही कार्यरत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
खासगीकरण न झाल्याने
सर्वसामान्यांना मोठा फायदा
भोसरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या व माझ्या वॉर्डात असलेल्या भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव भाजपातीलच काही मंडळींनी आखला होता. हा डाव आम्ही नागरिकांच्या मदतीने हाणून पाडला. त्याचा मोठा फायदा करोनाकाळात सर्वसामान्य नागरिकांना झाला. या रुग्णालयात तब्बल सहा हजार करोना बाधितांवर मोफत उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे खासगीकरण न झाल्यामुळे या रुग्णांना मोफत उपचाराचा फायदा घेता आला, याचे मोठे समाधान असल्याचेही लांडगे म्हणाले.