सासवड -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक पथविक्रेते, फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद पडल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशा व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी सासवड नगरपालिकेकडून केंद्र शासन पुरस्कृत प्रधान मंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. पथविक्रेत्यांचे व्यवसाय सुरळीत होण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांच्या मार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार असून शहरातील अशा व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.
सासवड शहरातील फेरीवाला, पथविक्रेता यांना सूक्ष्म पतपुरवठा करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना बॅंकेमार्फत प्रतिलाभार्थी 10 हजार रुपये इतका कर्जपुरवठा उपलब्ध करून देणार आहे. संबंधित लाभार्थींनी नियमित कर्ज फेड केल्यास तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे हातावर पोट असणाऱ्या पथविक्रेत्यांना व्यवसाय करणे सोपे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार ही योजना राबविण्यात येत आहे. सासवड नगरपालिका बॅंक आणि लाभार्थी यांचा आधार लिंक मोबाइल नंबरद्वारे या योजनेचे समन्वयाचे कामकाज पाहणार असल्याचेही जळक यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात पथविक्रेत्यांचे संसार मेटाकुटीला आले असल्यामुळे केंद्र शासनाने अशा व्यावसायिकांना नवीन योजना मंजूर केली असून सासवड शहरातील पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्षा निर्मला जगताप, सर्व नगरसेवक, शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी विनोद जळक, अधिकारी जास्मिन मधाळे यांनी केले आहे.
विशेष अनुदानाचा लाभ
एका वर्षाच्या परतफेड मुदतीसह 10 हजार रुपयांपर्यंतचे बॅंकेमार्फत विनातारण खेळते भांडवल कर्ज मिळेल. या कर्जावर आरबीआयच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहील. नियमित डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅकसाठी पात्र राहणार असून दरमहा हप्त्यांची परतफेड केल्यास 7 टक्क्यांवरील व्याजावर विशेष अनुदानाचा लाभ मिळणार आहे.