तीन महिला करोनाबाधित, वाढत्या रुग्णसंख्येने धास्ती वाढली
सातारा (प्रतिनिधी) – कण्हेर (ता. सातारा) येथे महिला बचत गटाच्या मिटींगला उपस्थित असणाऱ्या दहा महिलांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील तीन महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून वाढत्या रुग्ण संख्येने ग्रामस्थांची धास्ती वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 67 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कण्हेर येथील 3 महिला पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. दिवसेंदिवस कण्हेरमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्याने पुन्हा गाव हादरून गेले आहे. कण्हेरमधील बचत गटातील 65 वर्षीय महिला करोनाबाधित आढळली होती. बचत गटाच्या मिटिंगदरम्यान अनेक महिला त्यांच्या संपर्कात आल्या होत्या. बाधित महिलेच्या संपर्कातील 10 महिलांना कवारंटाइन केले होते. त्यांचे स्वॅब घेऊन तपासणी केली असता शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 3 महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.
या महिलांच्या निकट संपर्कातील 8 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. गावात प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या असून बाधित परिसर सील केला आहे. दरम्यान आशा व अंगणवाडी सेविकांनी घर टू घर तपासणी करून सर्वे सुरू केला आहे. कण्हेरमध्ये करोनाचे रुग्ण सापडत असल्याने गाव कंटेनमेंट झोन जाहीर केले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत बेशिस्त व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून ड्रोन कॅमेराद्वारे निरीक्षण करण्यात आले. यावेळी तालुका पोलीस व ग्रामपंचायतीच्या संयुक्तपणे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोडोलीतील साखळी तुटता तुटेना
शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार सातारा तालुक्यातील कोडोली येथे 3, कण्हेर येथे 3, नागठाणे व जिहे येथे प्रत्येकी एक असे आठजण पॉझिटिव्ह आले आहेत. जिहे गावातील करोनाचा वाढता आकडा रोखण्यात प्रशासनाला यश आले असले तरी कोडोली आणि कण्हेरमध्ये वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब बनली आहे. कोडोली येथील साखळी तुटली नाही तर सातारा शहरालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.