मोदींनी देशासाठी काय केले याचे आत्मपरिक्षण करावे -शरद पवार

गांधी घराण्याने देशासाठी प्राण दिले

नगर: एकीकडे बोट हातात धरून राजकारणात आल्याची कबुली देत असतांना दुसरीकडे मात्र थेट घरापर्यंत जावून टिका करणे हे पंतप्रधानपदावर बसलेल्या नरेंद्र मोदींना शोभत नाही. गांधी घराण्याने देशाच्या उभारणीसाठी त्याग तर केलाच पण प्राण देखील दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलतांना मोदींनी देशासाठी काय केले याचे आत्मपरिक्षण करावे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर येथील पांजरपोळ येथील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात, पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आमदार राहुल जगताप, आमदार वैभव पिचड, अशोक विखे आदी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मोदी आल्यानंतर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय केले, बेरोजगारांना किती रोजगार उपलब्ध करून दिला. व्यापारी व उद्योगात काय प्रगती केली, हे सांगण्यापेक्षा ते शरद पवार आणि गांधी घराण्यावर बोलतात. गांधी नेहरूंची देशासाठी काय केले हे देशाला नाही तर जगाला माहित आहे. नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी तरूंगवास भोगला. त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी महिला म्हणून देशाच्या पंतप्रधान झाल्या. त्यांनी देशाची गरिबी हटविण्यासाठी प्रयत्न केले. राजीव गांधी यांनी देशात आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञान आणले. त्यामुळे आज देशाची आधुनिक प्रगती झाली. या गांधी घराण्याचा देशाच्या उभारणीत मोठा वाटा असून त्यांनी देशासाठी त्याग नाही तर प्राण देखील दिले आहेत. आता शरद पवार यांच्यावर ते बोलतात. माझ्या गावाची चर्चा करतात. न काही करता माझ्या गावाची जाहिरात होत आहे. मी काय केले आहे. हे आता महाराष्ट्राला माहिती आहे. पण मोदी तुम्ही देशासाठी काय केले हे सांगा. असा सवाल पवार यांनी यावेळी केला.

नगरच्या व्यापाऱ्यांना धमक्‍या देण्यात येत आहे. परंतू अशा कोणी धमक्‍या दिल्या तर राष्ट्रवादी त्यांचा बंदोबस्त करेल असा इशारा यावेळी पवार यांनी दिला. यावेळी बाळासाहेब थोरात, संग्राम जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची भाषणे झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.