ग्रामीण भागात कचरामुक्तीसाठी अनोखा उपक्रम : झाड फाउंडेशन, ग्लोबल क्लीनचा पुढाकार
वाघोली- झाड फाउंडेशन व ग्लोबल क्लीन यांच्या वतीने एक एकर क्षेत्रामध्ये केसनंद (ता. हवेली) येथे दत्तात्रेय हरगुडे यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प स्वखर्चाने सुरू केला आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा लाभ नागरिक घेत असून सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांचा घरगुती वापरातील कचरा वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये असल्यामुळे प्रक्रिया प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केसनंद येथील वार्ड क्रमांक चार, वार्ड क्रमांक पाच येथील नागरिकांसाठी सध्या हा प्रायोगिक तत्त्वावर “ना नफा, ना तोटा’ या उद्देशाने कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. परिसरातील घरगुती वापराच्या कचरा याठिकाणी स्वखर्चाने आणून त्याच्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून ओला कचरा मोफत शेतकऱ्यांच्या शेतात खत म्हणून टाकण्यासाठी सुद्धा देण्यात येत आहे. याबाबत प्रकल्प चालक दत्ता हरगुडे म्हणाले की, नागरिकांच्या ओला व सुका अशा कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातील घटक पदार्थांचे योग्य त्या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी व परिसरातील कचरा समस्या कमी करण्यासाठी झाड फाउंडेशन व ग्लोबल या संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. आगामी काळातील पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांसाठी हा प्रक्रिया प्रकल्प मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रकल्पाची नुकतीच माजी सरपंच तानाजी हरगुडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, विकास हरगुडे,सुरेश साबळे, विशाल हरगुडे आदींनी पाहणी करून कौतुक केले आहे. माजी सरपंच तानाजी हरगुडे म्हणाले की, ग्रामीण भागातील कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी व प्रत्येक गाव कचरामुक्त करण्यासाठी अशा प्रकारचे कचरा प्रक्रिया प्रकल्प त्या त्या गावांमध्ये उभे राहणे काळाची गरज झाली आहे.