#व्यक्‍तिमत्त्व: एक विजय मनाचा

सागर ननावरे

गेल्या आठवड्यात घरी निवांत टीव्ही पाहात बसलो होतो. टीव्हीवर एक सिनेमा लागला होता. घरातील सर्वजण तो सिनेमा पाहात होते. त्या सिनेमातून एका जिद्दी पहिलवानाचा प्रेरणादायी प्रवास सिनेमाबाबत अधिकच उत्सुकता निर्माण करीत होता. सिनेमा ऐन रंगात आला होता आणि त्याचवेळी एका प्रसंगात त्या सिनेअभिनेत्याने एक डायलॉग मारला. तो डायलॉग होता “कोई तुम्हे तब तक नहीं हरा सकता, जब तक तुम खुद से ना हार जाओ.” जसा तो डायलॉग कानावर पडला तसा आपोआपच तोंडातून ‘व्वा’ असे दिलखुलास उद्‌गार बाहेर पडले.

खरं तर मनाला भावणाऱ्या गोष्टींबाबत आपण तत्काळ असे उद्‌गार काढत असतो. तसेच काहीसे माझ्याबाबतही तो सिनेमा पाहताना घडले. त्यानंतर त्यावर मी बराच काळ विचार केला. खरंच किती तथ्य होते त्या डायलॉगमध्ये. आयुष्यात जोपर्यंत आपण स्वतः हार मानत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. ज्याने आपण कोलमडून जावे, असे प्रसंग आयुष्यात घडत असतात. अपयश, नकारात्मकता, भीती आणि न्यूनगंड या साऱ्या गोष्टी आपल्या मनावर आघात करीत असतात. म्हणूनच आपण प्रथमतः मनाने खंबीर आणि विजयी व्हायला हवे. कुणीतरी फार छान म्हटले आहे की, पराभव पहिल्यांदा रणात होत नसतो तर तो मनात होत असतो. मनाने पराभूत माणसे रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेली असतात ती कधीच रणात पराभूत होऊच शकत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माणूस शरीराने कितीही सशक्त आणि सुदृढ असला तरी तो मनाने खचलेला असेल तर तो कधीही विजय मिळवू शकत नाही. त्यासाठी माणसाने मनाला खंबीर करणे किंवा मनात आत्मविश्‍वासाची ठिणगी पेटविणे गरजेचे असते. मनोबल ही अशी एकमात्र गोष्ट आहे जी आपला विजय सुकर करीत असते. याबाबत एक आदर्श उदाहरण द्यायचे झाल्यास,
आपल्या तमाम मराठीजनांचे दैवत म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराज एक एक किल्ला जिंकून वेगाने हिंदवी स्वराज्याचा विस्तार करीत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी विजापूरच्या बलाढ्य आणि धिप्पाड अफजलखानाने विडा उचलला होता. भल्याभल्यांना केवळ त्याच्या धिप्पाड शरीरयष्टीने घाम फुटत असे. अशा या व्यक्तीशी दोन हात करणे कोणाचेही काम नव्हते. अफजलखानाने दगा फटका करून राजांना रोखण्यासाठी प्रतापगडावर भेटीचा निरोप धाडला आणि राजांनीही कसलाही विचार न करता तो स्वीकारला. त्यानंतर दोघांची भेट प्रतापगडावर झाली. धिप्पाड शरीरयष्टीच्या अफजलखानाने गळाभेटीचा बहाणा करून दगाफटका करण्याचा प्रयत्न केला; परंतु शिवरायांच्या चतुराईपुढे त्याचा निभाव लागला नाही आणि अफजलखानाचा वध छत्रपती शिवरायांनी केला.

ही सत्यकथा आपण प्रत्येकाने अगदी बालपणापासून ऐकली आहे. यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती गोष्ट म्हणजे त्या धिप्पाड खानाला भिडण्याचे साहस महाराजांनी का केले असावे आणि याचे उत्तर म्हणजेच महाराजांचे सशक्त असे मनोबल. महाराजांनी मनात विजयाची मशाल पेटती ठेवल्यामुळे रणातही विजय साकारता आला.

आज अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यात सशक्त मनाच्या माणसांनी घवघवीत असे यश संपादन केले आहे. हिंदीत मनोबलावर एक अतिशय बोधप्रद असे वाक्‍य आहे. ते वाक्‍य म्हणजे, “मन के हारेहार है, मन के जीते-जीत.” म्हणजेच मनाने हार पत्करली तर आपला पराजय निश्‍चित आहे. परंतु मनात जर जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सळसळता आत्मविश्‍वास असेल तर समोर कोणीही असो आपला विजय शक्‍य आहे. मित्रांनो मनोबल हे व्यक्तीच्या वय किंवा वजनावर ठरत नाही. तर मनोबल ठरते हे आपल्या सकारात्मक विचारांवर आणि इच्छाशक्तीवर. एक मुंगी बलाढ्य हत्तीला जमिनीवर लोळवू शकते, ती फक्त तिच्या मनोबलावरच.

आज आपण शून्यातून विश्‍व निर्माण करणाऱ्या धीरुभाई अंबानी, सचिन तेंडुलकर, बिल गेट्‌स, मेरी कोम अशा अनेक विभूतींची नावे आदराने घेतो, त्यांच्या यशोगाथांना आदर्श मानतो. हे सारे आपल्यापेक्षा वेगळे का होते? तर याचे उत्तर आहे त्यांच्यातील मनोबलामुळे. हे सर्वजण आपल्यातील एकमेवद्वितीय क्षमता आणि मनाचे सामर्थ्य जाणून होते आणि याच सामर्थ्याच्या आणि मनोबलाच्या जोरावर त्यांनी जग जिंकले. म्हणूनच भीती, निराशा, कमजोरी, परिस्थिती, अपयश आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाताना आपल्या मनाची शक्ती त्याच्यापेक्षा कैकपटीने वाढवा आणि मग बघा आपल्या खंबीर आणि सशक्त मनोबलाने आपण भव्यदिव्य यश मिळवण्यासाठी नक्कीच सज्ज असू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)