सातारच्या श्रेया कात्रेची ‘कलाम क्लायमेट फेलोशिप’साठी निवड

सातारा : विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या फुलब्राइट- कलाम क्लायमेट फेलोशिपसाठी सातारा येथील श्रेया श्रीकांत कात्रे हिची निवड झाली आहे. दैनिक प्रभातचे सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांची कन्या श्रेया सध्या आसाममधील गुवाहाटी आयआयटीमध्ये ‘अर्थ सायन्स’ या विषयातील पी. एचडी. करीत आहे. 

फुलब्राइट- कलाम फेलोशिपसाठी तिने परीक्षा देऊन झालेल्या अंतिम मुलाखतीनंतर तिची फेलोशिपसाठी निवड झाली. गुवाहाटी आयआयटीमधून या फेलोशिपसाठी निवड होणारी ती पहिलीच विद्यार्थिनी आहे.

भारत आणि अमेरिकेतील वातावरण बदल (climate change) याविषयासंबंधी संशोधन करण्यासाठी आणि दोन्ही राष्ट्रांना या अडचणींविरुद्ध सुसज्ज करण्यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्याकरता पी. एचडी करणाऱ्या भारतातील निवडक विद्यार्थ्यांना फुलब्राइट- कलाम क्लायमेट फेलोशिप दिली जाते. याअंतर्गत विद्यार्थी 6 ते 9 महिन्यांसाठी अमेरिकेतील विद्यापीठात संशोधनासाठी जाऊ शकतो.

1950 पासून सुरू झालेला फुलब्राइट कार्यक्रम अत्यंत प्रतिष्ठित व मानाचा मानला जातो. यात कलाम क्लायमेट फेलोशिपप्रमाणेच फुलब्राइट नेहरू, हर्बर्ट एच. हम्फेरी फेलोशिप, परदेशी भाषा इत्यादी फेलोशिपचाही समावेश आहे. कलाम क्लायमेट फेलोशिप दरवर्षी भारतातील 3 ते 5 विद्यार्थ्यांना दिली जाते. या प्रोग्रॅममध्ये संशोधनासाहित सांस्कृतिक देवाणघेवाणीला खूप महत्व आहे. तसेच फेलोशिपसाठी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य केले जाते.

कलाम क्लायमेट कार्यक्रम २०१६ मध्ये सुरु झाला. हा कार्यक्रम युनायटेड स्टेटस- इंडिया एज्यूकेशनल फाउंडेशन आणि भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग या दोघांच्या पर्यवेक्षणाखाली येतो.

श्रेयाचे शिक्षण  साताऱ्यातील नवीन मराठी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या ठिकाणी झाले.

सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातून तिने बी. टेक. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर श्रेयाने गुवाहाटी आयआयटीमधून एम. टेक. ची पदवी मिळवली. आता ती तेथेच पी. एचडी. करत असून या फुलब्राइट- कलाम फेलोशिपमार्फत अमेरिकेमध्ये पुढील संशोधन करणार आहे. सर्व क्षेत्रांतील मान्यवरांसह अनेकांनी श्रेयाचे अभिनंदन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.