पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्य प्रमुख संघटकपदी प्रशांत कनोजिया यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
त्यात कनोजिया यांच्यावर राज्य प्रमुख संघटकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थी दशेपासून सामाजिक व विद्यार्थी चळवळीत कार्य करणारे कनोजिया यांनी महाविद्यालयात भारतीय विद्यार्थी सेना शाखाध्यक्ष पदापासून कोथरुड विभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अनेक पदांवर आजपर्यंत उत्तम कार्य केले आहे.
विद्यार्थ्यांचे प्रश्न असो किंवा पालकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठविण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. याशिवाय, वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिकांना सहसुकर मार्ग मिळावा आणि रुग्णांना, अपघातग्रस्तांना वेळेत हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी कनोजिया यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या हेल्प रायडर्सचे ते संस्थापक सदस्य आहेत.